This is the Marathi translation of the book “Miraculous Days with Mohanji” – a book of mystic experiences with Mohanji by Rajesh Kamath.
प्रतिष्ठित इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आय.आय.टी.) कॉलेजमधून भौतिकशास्त्र विषयामध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर मी थेट जडवादी भौतिक विश्वामध्ये उडी मारली आणि १९ वर्षांपेक्षाही अधिक वर्षे माहिती आणि तंत्रज्ञान (आय.टी.) क्षेत्रामध्ये नोकरी केली. मी दिवसभर व्यावसायिक (कार्पोरेट) क्षेत्रातील स्पर्धात्मक शर्यतीत प्रबलतेने धावत होतो, रात्री शक्य तितक्या आरामदायीपणे आध्यात्मिकतेमध्ये वरकरणीच रस घेत होतो.व्यवसायाने इंजिनिअर, बुद्धीने वैश्लेषिक, मनाने भटका आणि आत्म्याने हरवलेला हा असा मी. जडवादी भौतिक आणि आध्यात्मिक अशा दोन वेगळ्या विश्वात मी वावरत होतो. या दोन्ही विश्वांची अगदी व्यवस्थितपणे दोन भागामध्ये मी विभागणी केलेली होती आणि त्या विभागांमध्ये मी माझ्या सोयीनुसार येत जात असायचो. हे असे, माझे आध्यात्मिक गुरु मोहनजींची भेट व त्यांच्यासोबत प्रवास सुरू करेपर्यंत चालू होते. त्यांच्यासोबत केलेला पाच वर्षांचा प्रवास आणि जो अजूनही पुढे सुरू आहे; तर या संपूर्ण काळामध्ये माझ्या विचारांची पूर्णपणे दिशाच बदलून गेली. अचानक माझे जडवादी भौतिक आणि आध्यात्मिक जग एकमेकांच्या विरुद्ध जाऊ लागले. सर्वकाही विपरीत आणि माझ्या नियंत्रणाबाहेर जाऊ लागले. गुरुंसोबतच्या माझ्या या खूपच कमी लोकांनी वाटचाल केलेल्या मार्गावरून होणाऱ्या प्रवासात, अनपेक्षितपणे काहीतरी घडत असलेल्या आणि निरर्थक गोष्टींचेही तात्पर्य लावण्याच्या प्रवासामध्ये सहभागी होण्यासाठी तुमचे स्वागत आहे.